जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मोहाडी गट क्रमांक 60 येथील शिरसोली रस्त्यालगतची सुमारे 13 एकर महापालिकेची जागा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी नगराध्यक्ष तुकाराम श्रीपत चौधरी यांनी ही जागा महापालिकेसाठी विकत घेतली होती. 1997 ते 2011 या कालावधीत या ठिकाणी अटलांटा कंपनीचे क्रशर सुरू होते. त्यानंतर 2011 पासून ही जागा ओसाड पडून होती. याच ठिकाणी अटलांटा कंपनीची खडीही मोठ्या प्रमाणात पडून होती. 2017-18 मध्ये येथे असलेले स्लॉटर हाऊस बंद करण्यात आले.
कोरोनानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये या परिसरात काही तुरळक झोपड्या उभ्या राहिल्याचे निदर्शनास आले. पुढे 2024 मध्ये तांबापुरातील काही रहिवाशांनी त्यांची राहती घरे विकून, काही अज्ञात व्यक्तींनी प्रत्येकी पाच हजार रुपये घेऊन या नागरिकांना महापालिकेचीच जागा विकल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, या नागरिकांची नावे अद्याप तांबापुरा मतदान यादीत असून त्यांनी यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत त्याच प्रभागातून मतदान केले आहे.
दरम्यान, शासनाच्या महसूल विभागाने (शासन निर्णय क्रमांक : जमीन-2026/प्र.क्र.20/जमीन-1, दिनांक 25 मार्च 2026) 2011 पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. मात्र, हा निर्णय महानगरपालिका किंवा नगरपालिका मालकीच्या जमिनींसाठी लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच 2022-23 नंतर झालेल्या झोपड्यांनाही हा निर्णय लागू होत नाही.
जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या जागा आधीच मर्यादित असल्याने या जागेचे संरक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेने या ठिकाणी कंपाउंड वॉल उभारण्यासाठी इस्टिमेट तयार केले असून लवकरच संरक्षणात्मक काम सुरू करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेतून प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये. जर कोणी अतिक्रमण केले असेल, तर ते स्वतःच्या खर्चाने तात्काळ काढून घ्यावे. अन्यथा प्रशासन लवकरच अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा