Top News

पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्व दिलासा – कृषीसम्राट व भरारी फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळ वाटप

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जिल्ह्यातील अलीकडच्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषीसम्राट फाउंडेशन आणि भरारी फाउंडेशन यांनी संयुक्तपणे मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके तसेच दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला सनशाईन अॅग्रो यांनीही सहकार्य दिले.

रविवारी सकाळी जळगाव येथे झालेल्या या मदत वितरण कार्यक्रमात खासदार स्मिता वाघ यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, भरारी फाउंडेशन शेतकरी संवेदना अभियानाच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहील. तसेच शासन व सामाजिक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी आमदार सुरेश भोळे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत सांगितले की, “ही मदत छोटी असली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. या संकटाला न घाबरता, नव्या जोमाने शेतीत पुन्हा उभे राहा,” असे त्यांनी आवाहन केले.

जळगाव, पाचोरा व जामनेर तालुक्यातील धानवड, उमाळे, सुभाषवाडी वराड, पिंपरी, घुसर्डी, शिंदाड आणि नेरी दिगर या गावांतील शेतकरी या मदतीसाठी उपस्थित होते.

कार्यक्रमात खासदार स्मिता वाघ यांच्यासह अनिश शहा, हर्ष चौधरी, रवींद्र लढ्ढा, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, नानासाहेब सुर्यवंशी, अनिकेत पाटील, आशिष भंडारी, आदेश ललवाणी, अॅड. किशोर पाटील, सपन झुनझुनवाला, चित्रा चौधरी, सागर पगारीया, भगवान तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन दीपक परदेशी यांनी तर आभार भूषण लाडवंजारी यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक जोशी, देवराज बोरसे, अक्षय सोनवणे आणि शिरीषकुमार तायडे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने