चित्रकार सुनील दाभाडे यांची अभूतपूर्व कला सादर
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक, उपक्रमशील शिक्षक आणि चित्रकार म्हणून परिचित असलेले सुनील दाभाडे यांनी यंदाची आषाढी एकादशी अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. त्यांनी मोरपिसावर रंगांची नजाकत साधत विठ्ठल-रुख्मिणीचे अत्यंत सूक्ष्म व सुरेख चित्र साकारत अनोखी वारी साजरी केली.
हे चित्र तयार करताना दाभाडे यांनी केवळ १५ मिनिटांचा कालावधी घेतला. विशेष म्हणजे, इतक्या सूक्ष्म पृष्ठभागावर इतके सुंदर आणि नेमके चित्र साकारणे ही एक मोठी कलात्मक कामगिरी मानली जाते.
याआधीही त्यांनी अनेक वेगळ्या माध्यमांवर चित्र रेखाटून कला सादर केली आहे. उदाहरणार्थ, ज्वारीच्या भाकरीवर, पिंपळाच्या पानावर तसेच ११११ शब्दांपासून तयार करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्राने सर्वत्र कौतुक मिळवले होते. या उल्लेखनीय कलेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड (लंडन) आणि ओ.एम.जी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे.
सुनील दाभाडे यांची विठुमाऊलीवरील निष्ठा याआधीही विविध माध्यमातून व्यक्त झाली आहे. त्यांनी तुळशीच्या पानांवर व विटेवर देखील विठ्ठलाचे सुरेख चित्र रेखाटले होते. विशेष म्हणजे विटेवर साकारलेले हे पेंटिंग थेट पंढरपूरच्या विठोबा मंदिरात पोहोचले आहे, हे त्यांच्या कलेचे खरे यश मानले जाते.
या अनोख्या उपक्रमामुळे दाभाडे यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचत असून, पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक कला यांचा सुंदर संगम त्यांनी घडवून आणला आहे. त्यांच्या या अभिनव सादरीकरणाला सर्व स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा