जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगावचे माजी आमदार आणि सलग नऊ वेळा विधानसभेवर निवडून गेलेले सुरेश जैन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील मेळाव्यात १९९९ मध्ये सुरेश जैन मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते, मात्र ते अमराठी असल्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नावाला तीव्र विरोध केला होता, असा गौप्यस्फोट केला.
१९८० ते २०१४ या काळात सुरेश जैन यांनी काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या वेगवेगळ्या पक्षांकडून मोठ्या मताधिक्याने जळगाव मतदारसंघात विधानसभेची निवडणूक जिंकली. एकदा शिवसेनेत असताना त्यांना मंत्रीपदही मिळाले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने आपण मंत्री होऊ शकलो, हे त्यांनी अनेकदा आपल्या जाहीर भाषणांत नमूदही केले होते.
पण १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुरेश जैन यांचे नाव चर्चेत येताच, बाळासाहेब ठाकरे यांनी ‘ते अमराठी आहेत’ या कारणावरून त्यांना विरोध केला होता, अशी आठवण राज ठाकरे यांनी या मेळाव्यात सांगितली. त्यांनी यापूर्वीही अशा स्वरूपाची विधाने करून बाळासाहेब ठाकरेच सुरेश जैन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विरोधात होते, असे नमूद केले होते.
त्याकाळी सुरेश जैन यांनी मात्र हे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी ही गोष्ट पुढे आणल्यामुळे या वादाला नव्याने उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश जैन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरेश जैन यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देऊन भाजपच्या उमेदवारांना सक्रिय पाठींबा दिला होता. त्यानंतर ते पुन्हा राजकारणाच्या आडसर रेषेत गेले. काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुरेश जैन यांची जळगाव विमानतळावर ‘योगायोगाने’ भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी “ते अजूनही आमचेच नेते आहेत” असे विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडले होते.
टिप्पणी पोस्ट करा