Top News

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष


जळगाव विभागीय कार्यशाळेसमोर तीव्र आंदोलन

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने 5 मार्च रोजी जळगाव विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष प्रशांत चौधरी आणि सचिव विलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.

वेतनवाढ, भत्त्यांच्या थकबाकीसाठी आंदोलन
एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. 2016 ते 2020 या कालावधीत करण्यात आलेल्या वेतनवाढीचा फरक, घरभाडे भत्ता फरक, तसेच महागाई भत्त्यातील वाढीचा फरक यासंबंधी शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. या संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची पूर्तता होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

याच पार्श्वभूमीवर मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे आणि सरचिटणीस हणमंत ताटे यांनी राज्यव्यापी निदर्शनांचे आयोजन केले होते. त्याअंतर्गत जळगाव विभागातही तीव्र आंदोलन करण्यात आले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व
या आंदोलनाचे नेतृत्व प्रशांत चौधरी, विलास सोनवणे, मोहन बिडकर, योगेश सपकाळे, विकास पाटील, प्रदीप दारकोंडे, सारनाथ जोहरे, गोकुळ पाटील, राजेश साळवे, सतीश वंजारी, लीलाधर चौधरी, अविनाश सोनवणे, रणजित सोनवणे आणि सुरेश जयस्वाल यांनी केले.

याशिवाय, आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी राजू पारधी, गौरव जोशी, भीमराव पवार, तसेच महिला कर्मचारी अर्चना सोनवणे, हर्षा सरोडे, अर्चना पाटील यांचे विशेष योगदान राहिले. भांडार विभागाचे संदीप बाविस्कर आणि श्रीपाद ब्रम्हक्षत्रिय यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला.

सरकारकडून ठोस निर्णयाची मागणी
एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि भत्त्यांची थकबाकी त्वरित अदा करण्याची मागणी केली असून, यासंदर्भात प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने लवकरच यावर निर्णय न घेतल्यास राज्यभरात एसटी कामगार मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडतील, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने